स्वामी फार तापट होते असा बोध एकंदरीत उपलब्ध असलेल्या समकालीन लिखाणावरून होतो. पण मला असे वाटत नाही. माझी आई, माझ्या लहानपणी रागावली की मला “मेल्या मर ” असे म्हणायची. ह्याचा अर्थ तिची तशी इच्छा होती असा होतो का? मुळीच नाही.
गोविंद बल्लाळ मुळेकर हे मुंबईकर आणि स्वामींचे परमभक्त. आपल्या कुवतीप्रमाणे यथासांग स्वामींची सेवा करणारे मुंबईचे ख्यातनाम दैवेज्ञ ब्राह्मण. स्वामीही त्यांना “माझा गोविंदा” असे म्हणत असत.
तर ! हे मुळेकर एकदा स्वमिदर्शनप्रित्यर्थ अक्कलकोटला आले होते. तिन्हीसांजेच्या वेळी त्यांना एका विषारी सापाने डसले.गावात डॉक्टर नाही. औषध उपचाराची योग्य सोय नाही. दळणवळण नाही. अश्यात अंगात विष भिनत चालेले. अंग हळूहळू काळेनिळे पडायला लागले. त्यांच्या तोंडाला फेस आला आणि मुळेकर समजले की आपला शेवटचा क्षण आता जवळ आहे. त्यांनी गावकर्यांना सांगितले “मला माझे शेवटचे क्षण माझ्या समर्थाबरोबर घालवायचे आहेत. मला वटवृक्षाखाली घेऊन चला” गावकर्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना घेऊन मठात आले.
मुळेकराना आणणारे गावकरी मठाची पायरी चढले आणि स्वामीनी रुद्रावतार धारण केला. शिवीगाळ, आरडओरडा, थयथयाट करत स्वामी ओरडले ” बामन्या ! अजून एकही पायरी चढलास तर माझ्याशी गाठ आहे !! असे म्हणत स्वामीनी आपल्या पायातील पादुका फेकून मुळेकरावर भिरकावल्या. त्या पादुका डोक्याला लागून मुळेकराना जखम झाली आणि भळभळा रक्त वाहू लागले. मुळेकराच्या तोंडचे पाणीच पळाले. शेवटच्या क्षणी मला माझा भगवंत शरण देत नाही ह्या कल्पनेने ते फार दुःखी झाले.
मठाच्या बाहेरच आपण आपले प्राण त्यागावे असे त्यांनी ठरवले. आणि गावकर्यांना तसे सांगितले.थोडयावेळाने मुळेकराचे विष आपसूक उतरले आणि स्वामीही शांत झाले.
स्वामी स्वतः त्यांच्याकडे गेले आणि “माझ्या गोविंदा” करत त्यांना मिठी मारली. आणि म्हणाले “गोविन्द्या अरे! मी तुझ्याशी नाही तुला चढत असलेल्या विषाशी बोलत होतो”
मुळेकराच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते. स्वामी ते आपल्या हातानी पुसत होते .
।।श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ।। – दिलीप आलशी .