गोपाळपंत केळकर नावाचे स्वामींचे एक भक्त होते. ते पूर्वी पोटाच्या विकाराने आजारी असत. त्यांना मरणप्राय यातना होत. एक दिवस त्यांना असे वाटले कि, जो कोणी ह्या जगताचा ईश्वर असेल त्यांने जर मला बरे केले तर पुन्हा एका भगवंतावाचून कोणाचीही चाकरी करणार नाही. असा निश्चय करताच मग काय उशीर? ८ दिवसातच त्यांची व अक्कलकोट स्वामींची भेट झाली. व ते व्याधी मुक्त झाले. आणि ठरल्या प्रमाणे ते स्वामींच्या सेवेत रुजू झाले.
एकदा स्वामींचा मुक्काम हाचनाळ गावी पडला. सोबत शेपन्नास सेवेकरी होते,त्यात हे पंतही होते.दुसऱ्याच दिवशी पहाटे गोपाळपंत स्नानासाठी विहिरीवर गेले. गावात विहीर एकाच, त्यात पंतांकडे स्नानाचे भांडे नव्हते, ना गावात कोणाशी ओळख-पाळख. विहिरीवर काही ब्राम्हण व थोडे शुद्र होते. प्रथम पंतांनी ब्राह्मणानकडे भांडे देण्याची विनंती केली, पण त्यांना कोणीच दाद देईना, मग पंतांनी एका शुद्र कडून घागर घेवून स्नान आटोपले. ते पाहून काही सेवेकाऱ्यांनी त्यांची निंदा सुरु केली. त्यांतच एक बळवंतराव नावाचा स्वामींचा सेवक होता. त्याने तर- ‘ अरे हा कोकण्या बाटला, ह्याच्या हातचे पाणी ही पिऊ नका.’ असे सांगण्यास सुरुवात केली. ते ऐकून पंतांना रडू कोसळले. नंतर काही मंडळी म्हणाली-‘ ही गोष्ट न समजून घडल्याने आता त्यांना महाराजांचे तीर्थ द्या म्हणजे झाले.’ मग श्रीपाद भटाने पंतांना तीर्थ देवून शुद्ध करून घेतले. असो.
परंतु दुपारी जेवणाच्या पंगतीत पंतांचा परत अपमान झाला. काही मंडळींनी पंतांच्या बरोबर भोजन करण्यास आक्षेप घेतला. बळवंतराव ने तर पंतांचे पान पंगती बाहेरच ओढून ठेवले व ‘ जा तिकडे बैस. पंगतीत नको’ असे सांगितले. गोपाळपंत मनातून फार दुखी झाले. वारंवार मनातून दुखाचे काढ येवू लागले, पण आपला कैवारी कोण? इकडे त्यांचे जेवण रडत चालले होते आणि तिकडे स्वामींसाठी वाढलेल्या पानावर स्वामी बसलेच नाहीत. उलट ताट पाहताच शिव्या देवू लागले. ‘ आम्ही बाटलो, आम्हास शिवू नका. आम्ही जेवत नाही.’ असे म्हणत नरसिंह अवतार धारण केला, लोक विनंत्या करतच राहिले, परंतु कोणाचे काही चालेना. असे सायंकाळ पर्यंत चालले. मग थोडे शांत झाले. त्यावेळी पंतांना ,’माझा कोणी कैवारी नाही ‘ असे वाटले होते त्यावर ही कृती स्वामींनी दाखवली. दुसरे दिवशी गोपाळापंतांना पंगतीत योग्य मान मिळाला.

तात्पर्य- मनुष्याने उपेक्षा केली तरी ईश्वर मात्र कधीही उपेक्षा करत नाही.

Advertisements