|| श्री स्वामी समर्थ ||
सदर स्वामी कवन हे श्री अक्कलकोट स्वामी महाराज , तसेच माझे परम पूज्य श्री जनार्दन स्वामी खेर ,बडोदा यांना उद्देशून असून ते मी गुरूपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी चरणी अर्पण करीत आहे.
सदर स्वामी कवन मी सदगुरुंचे परवानगीनेच प्रसिद्ध करीत आहे.रचना
निलेश अविनाश जोशी
(श्री स्वामी प्रेरणेने)

” ओळखतात आपण मज श्री स्वामी
हि ना ओळख या जन्माची
हि ओळख आहे युगायुगांची||धृ||

आपण निजत होता शेषाशायानी
मन मोहुनी जाई कमललोचन पाहुनी
मी तृप्त व्हायचो मनी तुळशीपत्र अर्पुनी
मी नमन करी श्री विष्णवे नमः वदुनी ||१||

आपणच होता एकवचनी श्रीराम म्हणुनी
मी होतो वानर सेनेत एक वानर होऊनी
बांधिला सेतू सागरी धोंडे टाकुनी
मी नमन करी जय श्रीराम वदुनी ||२||

आपणच केल्यात श्रीकृष्णलीला वृन्दावनी
भक्तीत जाई गोपगोपी दंगुनी
मी हि एक होतो त्या गोपगोपिकांतुनी
मी नमन करी जय श्रीकृष्ण वदुनी ||३||

आपणच होता पंढरीस विटेवर उभे ठाकूनि
कटीवर हात ठेवुनी कंठी तुळशीमाळ घालूनी
नि नित्य येई वारीस भगवी पताका घेवूनी
मी नमन करी जय श्री विठ्ठल वदुनी ||४||

अवतीर्ण झालात गाणगापुरी श्रीनृसिंह सरस्वती म्हणुनी
ध्यानस्थ होई आपण संगमावरी स्नान करुनी
मी येई मठाभीतरी अति विनम्र होऊनी
मी नमन करी जय श्रीगुरुदत्त वदुनी ||५||

आपणच आलात अक्कलकोटी श्री नृसिंहभान म्हणुनी
भक्तांस उपदेश करी वटवृक्षाच्या छायेत बैसुनी
मी नमन करी श्री स्वामी समर्थ वदुनी
आशीर्वचन देई आपण ‘भिऊ नकोस म्हणुनी’||६||

या जन्मी तर एकाच आस मनी
श्री स्वामी श्री स्वामी जनार्दन स्वामी
कालीयुगीचे बादशहा तुम्ही हि स्वामी समर्थवाणी
उद्धारीले मज अनमोल प्रभोदन करुनी ||७||

मागणे हेची आता हो कैवल्यज्ञानी
अर्पितो हे जीवन आपुले चरणी
नको आता जन्म मृत्यू चे फेरे हो स्मर्तुगामी
मोक्षपदा न्या मज हो परब्रह्मा स्वामी ||८||

ओळखतात आपण मज श्री स्वामी
हि ना ओळख या जन्माची
हि ओळख आहे युगायुगांची||धृ||
||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
रचना
निलेश अविनाश जोशी
(श्री स्वामी प्रेरणेने)

Advertisements